भाजपाचे ठरले मात्र आघाडीचा उमेदवार ठरेना !


भुसावळ विधानसभा निवडणूक : अपक्षांची होणार भाऊगर्दी

भुसावळ- भुसावळ विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने मंगळवारी विद्यमान आमदार संजय सावकारे यांना तिकीट देवून इच्छुकांच्या शिडातील हवा काढली आहे तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे तीन इच्छुक उमेदवारांनी दावा केला असतानाही अद्याप उमेदवार ठरला नसल्याने समर्थकांमध्ये संभ्रम वाढला आहे. दुसरीकडे यंदाही निवडणुकीत अपक्षांची भाऊगर्दी वाढली असून भारीपा बहुजन महासंघाने प्रा.सुनील सुरवाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, एमआयएम व मनसेने अद्याप उमेदवार जाहीर केले नसल्याने भाजपा तसेच काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीतून तिकीट न मिळालेले इच्छूक दोन्ही ठिकाणाहून उमेदवारी मिळवण्याचा निश्‍चित प्रयत्न करतील, असे राजकीय विश्‍लेषकांना वाटते.

भुसावळात वाढली चुरस
सलग दोन टर्मपासून आमदार असलेल्या संजय सावकारे हे या निवडणुकीत विजयी झाल्यास त्यांची हॅट्रीक होणार आहे तर दुसरीकडे विरोधकांनीदेखील त्यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे प्रबळ दावेदार असलेल्या तीन इच्छुकांनी भुसावळच्या जागेवर दावा केल्याने संभ्रम अधिक वाढला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सतीश घुले यांना यापूर्वीच उमेदवारी घोषित केली तर दुसरीकडे काँग्रेसतर्फे संजय ब्राह्मणे यांनीही जोरदार फिल्डींग लावली आहे तर माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनीही आघाडीत ही जागा आपल्याच सुटल्याचा दावा केला आहे. तीनही उमेदवारांच्या दाव्यामुळे संभ्रम कायम असून ही जागा सुटल्यानंतरही राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. अद्याप मनसे, एमआयएमने उमेदवार जाहीर न केल्याने भाजपा तसेच आघाडीतील उमेदवार येथून उमेदवारी करण्याची शक्यता अधिक आहे. अपक्षांचीदेखील या निवडणुकीत भाऊगर्दी असणार आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !