वरणगावचे मुख्याधिकारी बबन तडवींची उचलबांगडी

यावल पालिकेत बदली, तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून दखल ; वरणगावला आता श्याम गोसावी पाहणार कामकाज
वरणगाव- कार्यालयीन वेळेवर न येणे, मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून अप-डाऊन करण्यासह विकासकामे करताना नगराध्यक्षांना विश्वासात घेत न घेण्याचा ठपका वरणगावचे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर असल्याने नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे मुख्याधिकारी तडवी यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रार करीत त्यांना हलवण्याची मागणी केली होती. दरम्यान, मुक्ताईनगरचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांची वरणगाव पालिकेत बदली करण्यात आली आहे. मुक्ताईनगरसाठी सावदा पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची प्रभारी जवाबदारी देण्यात आली आहे.
नगराध्यक्षांच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
नगराध्यक्ष काळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांचे विधी नियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 44 व 4 (5) मधील तरतुदीनुसार तडवी यांची यावल पालिकेत बदली केल्याने वरणगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवार, 7 ऑगस्टपासून त्यांना कार्यमुक्त केल्यपत्रात नमूद आहे. तडवी यांच्या कामकाजातील तक्रारींमुळे काही महिन्यांपूर्वीच त्यांची चोपड्याहून बदली करण्यात आली होती हेदेखील विशेष !




