जळगावात वर्चस्व वादातून दोघांवर तलवारसह रॉडने हल्ला
कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष जखमी : संशयीत आरोपी ताब्यात
जळगाव- शहरातील जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील राका चौकात वर्चस्व वादातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल-मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष (भाजीपाला विभाग) धुडकू सपकाळे व गजानन देशमुख यांच्यावर चारचाकीतून आलेल्या तरुणांनी तलवारसह चॉपरने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वा वाजता घडली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्यात धुडकू सांडू सपकाळे (43) व त्यांचे सहकारी गजानन आनंदा देशमुख (50, दोघे रा.अयोध्यानगर) हे जखमी झाले.
वर्चस्व वादातून तलवार हल्ल्याचा संशय
बुधवारी दुपारी धुडकू सपकाळे, गजानन देशमुख व संजय चव्हाण हे तिघे राका चौकातील एका पानटपरीवर उभे असताना संशयीत आरोपी चारचाकी (एम.एच.19, बी.जे.0157) या वाहनातून आले. नितीन सोनवणे, कॉमेश सपकाळे, मयूर सपकाळे व भुरा कोळी यांच्यासह चारचाकी चालकाने सपकाळे व देशमुख यांच्यावर तलवार, चॉपर व बेसबॉलच्या दांड्याने हल्ला चढवला. एमआयडीसी पोलिसांनी घटना कळताच त्यांनी गर्दी पांगवली तर घटनास्थळावरून नितीन सोनवणे यांना ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी अन्य संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, धुडकू सपकाळे हे भाजपा नगरसेविका मीनाबाई सपकाळे यांचे पती आहेत.