माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या निर्णयाकडे लागले लक्ष

आता मुस्कुटदाबी बस्स झाली ! नाथाभाऊ निर्णय घ्या : साडेतीन वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाने खडसे समर्थक संतप्त : अॅड.रोहिणीताईंना नव्हे तर एकनाथराव खडसेंना उमेदवारी हवी : कार्यकर्त्यांची भावना
मुक्ताईनगर : आता मुस्कुटदाबी खूप झाली, नाथाभाऊ निर्णय घ्या, आम्ही सोबत आहोत, असा सूर खडसे समर्थक व त्यांच्यावर प्रेम करणार्या हितचिंतकांकडून सुरू आहे. सलग सहा टर्मपासून आमदार राहिलेल्या आमदार एकनाथराव खडसेंना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले आहेत तर खडसेंऐवजी त्यांची कन्या अॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर यांना तिकीट देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे मात्र खडसे समर्थकांनी नाथाभाऊंना विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी आग्रह धरला आहे. दरम्यान, कार्यकर्ते व समर्थकांचा रोष पाहता भाजपाने नाथाभाऊंना गुरुवारपर्यंत तिकीट न दिल्यास ते मोठा निर्णय घेवू शकतात? अशीदेखील चर्चा आहे.
साडेतीन वर्षांपासून नाथाभाऊंवर अन्याय
विविध आरोपांमुळे मंत्री पदापासून पायउतार व्हावे लागलेल्या खडसेंचे साडेतीन वर्षांतही मंत्री मंडळात आगमन झाले नाही मात्र त्यांच्यावर सुरू झालेल्या आरोपांच्या चर्चेचे गुर्हाळ कायम राहिले त्यामुळे आपल्या नेत्यांवर झालेल्या अन्यायाने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. चार हजारांवर कार्यकर्ते खडसे फार्म हाऊसवर जमले असून तिकीट कापले जाण्याच्या वृत्ताने संतप्त झाले आहेत. नाथाभाऊ अन्याय आता बस्स झाला, काहीतरी ठोस निर्णय घ्या, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे शिवाय अॅड.रोहिणीताईंना नव्हे तर नाथाभाऊंना आम्हाला विधानभवनात पहायचे आहे, असा सूरही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

कोंडी फोडण्याची अखेरची संधी
खरे तर अॅड.रोहिणी खडसेंनी कुठेही तिकीट मागितले नसताना त्यांना तिकीट देण्याचा प्रकार म्हणजे खडसेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लावण्याजोगा आहे त्यामुळे कार्यकर्ते अधिकच संतप्त आहे. खडसेंना तिकीट न मिळाल्यास ते अलगद राजकारणातून बाजूला होतील, असादेखील प्रयत्न यातून दिसून येतो त्यामुळे मुलीसाठी तिकीट खडसे तिकीट घेवून खडसे पक्षात राहतील वा काहीतरी धोरणातून निर्णय घेवून भाजपाला ते धक्का देवून आपली ताकद दाखवतील? असेदेखील बोलले जात आहे शिवाय अवघ्या काही तासात हे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
