माणुसकीला काळीमा ! : आदिवासी युवकाला वाहनामागे बांधून ओढले : तरुणाचा मृत्यू
नीमच : टवाळखोरांनी पिकअप वाहनाच्या मागे बांधून एका गरीब आदिवासी युवकाला ओढल्याने या युवकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला चौघांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातील नीमच इथं माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
सोशल मिडीयात व्हिडिओ व्हायरल
आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली. त्यानंतर आदिवासी युवक भैया लाल भील याला बांधून ओढत मारहाण केली. या घटनेनंतर युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 26 ऑगस्टला ही निर्दयी घटना घडल्याचं सांगितले जात आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी प्रमुख आरोपी छीतरमल गुर्जर, महेंद्र गुर्जर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिकअप गाडी चालक आणि सहचालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून बाकी आरोपींनाही लवकरात लवकर पकडलं जाईल असं पोलिसांनी सांगितले.



