धक्कादायक : भाजपाच्या माजी मंत्र्याची हत्या
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये भाजपचे मंत्री आत्माराम तोमर यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली ? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. निवासस्थानी तोमर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तोमर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तोमर यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तोमर यांना 1997 साली भाजपानं मंत्रिपद दिलं होतं. तसेच ते जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत.
संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
आत्माराम तोमर यांचे चालक सकाळी निवासस्थानी पोहोचले असता त्यावेळी दरवाजा बंद असल्याने त्यांनी तो वारंवार वाजवला मात्र दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आत्माराम तोमर यांचा मृतदेह जमिनीवर होता. त्यांच्या गळ्याभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. प्राथमिकदृष्ट्यात आत्माराम तोमर यांची टॉवेलच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.



