भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शक्तीप्रदर्शन करीत सादर केला उमेदवारी अर्ज

रॅलीचे शहरवासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत : उमेदवारी अर्जापूर्वी खडसेंचे घेतले आशीर्वाद
भुसावळ : सलग दोन टर्म पासून आमदार असलेल्या संजय सावकारे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करीत शुक्रवारी दुपारी उमेदवारी अर्ज सादर केला. सावकारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुक्ताईनगरात जावून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आशीर्वादही घेतले.
भव्य प्रचार रॅलीने वेधले लक्ष
हाती भगवे झेंडे, आमदार संजय सावकारे यांचे कट आऊटस् घेवून घोषणाबाजी देणारे कार्यकर्ते त्यासोबत पारंपरीक वाद्यांचा गजर तर दुसरीकडे संत तुकाराम-ज्ञानदेवांचा अभंग गात असलेल्या वारकर्यांनी शिस्तीत रॅली काढत शहरवासीयांचे लक्ष वेधले. जामनेर रोडवरील दर्डा भवन या भाजपाच्या प्रचार कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली.

वाहनावरून मतदारांना केले अभिवादन
उघड्या जीपमध्ये स्वार होत आमदार संजय सावकारे यांनी मतदारांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, आमदार गुरूमुख जगवानी, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, बबलू बर्हाटे, रजनी सावकारे, मीना लोणारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
