गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा
गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रुपाणी यांनी आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वाचें लक्ष असणार आहे.
राजीनाम्याचे कारण अस्पष्ट
विजय रुपाणी यांनी 26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसर्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये 182 पैकी 99 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत विधी मंडळ पक्षाचे नेते म्हणून रुपाणी आणि उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान, रुपाणी यांनी अचानक राजीनामा देण्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



