बस-कार अपघातानंतर वाहने पेटली : पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू
रांची : बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने पेटल्याने पाच प्रवासी होरपळून मरण पावले. हा अपघात झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा पोलीस स्टेशन परीसरातील मुरबंदा लारीजवळ बुधवारी झाला. या अपघातात बसमधील डझनभर प्रवासी जखमी झाले आहेत. महाराजा नावाची एक प्रवासी बस रामगडहून धनबादकडे जात असताना समोरुन येणार्या वॅगनार कारला धडकली. या अपघातात कार आणि बसमध्ये आग लागली. आग लागताच बसमधील प्रवासी बाहेर पडले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. पण, कारमधील लोकांना बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच राजरप्पा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विपीन कुमार घटनास्थळी पोहोचले. बस आणि कारमधील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला रामगढहून पाचारण करण्यात आले आहे. अग्नीशमन दलाने कशीबशी आग विझविली पण तोपर्यंत उशीर झाला होता या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जळून मृत्यू झाला.



