चार मुलींना विष पाजत पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न
नवी दिल्ली : निर्दयी बापाने आपल्या चार निष्पाप मुलींचा विष देऊन जीव घेतला व नंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने तिन्ही मुलींना किटकनाशक पाजलं आणि पाण्याच्या टाक्यात टाकलं. त्यानंतर स्वत:ही किटकनाशक प्राशन केलं आणि चौथ्या मुलीला घेऊन टाक्यात उडी घेतली. यात त्याच्या चारही मुलींचा वेदनादायी मृत्यू झाला. तर स्थानिकांनी मुलींच्या वडिलांना वाचवलं. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोषाल गावातील पुरखारामच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ज्यानंतर त्याच्या मुली आजी-आजोबाकडे राहत होत्या. पुरखाराम याला त्याच्या मेहुणीसोबत लग्न करायचं होतं. शुक्रवारी तो त्याच्या सासरी गेला. तेथून आपल्या चारही मुलींना घरी घेऊन आला. त्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यावर त्याने त्यांना किटकनाशक पाजलं. नंतर जवळच्याच पाण्याच्या टाकीत त्यांना फेकलं. त्यानंतर स्वत: किटनाशक पिऊन सर्वात लहान मुलीला घेऊन टाकीत उडी मारली.