एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले
बंगळुरू : एकाच कुटुंबातील पाच जणांचे सडलेले मृतदेह फासावर लटकवलेल्या अवस्थेत बंगळुरूत सापडल्याने खळबळ उडाली तर 9 महिन्यांचे बालक भूकेने व्याकूळ होऊन मृत झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अडीज वर्षांची मुलगी जिवंत राहिली आहे. कुटुंबप्रमुख असलेले हालेगेरे शंकर हे चार दिवसांनी घरी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ते गेले चार दिवस कुटुंबातील सदस्यांना फोन करत होते. मात्र, त्यांचा फोन कोणी उचलत नव्हते म्हणून ते कामावरून घरी आले. पोलिसांना संशय आहे की, या पाच जणांचा मृत्यू चार दिवस आधी झाला आहे. पाचव्या दिवशी रात्री मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा दुर्गंधी सुटली होती. त्यांना सील करून पोस्टमार्टेमला पाठविण्यात आले.
सुदैवाने चिमुकली बचावली
शंकर यांची पत्नी भारती (51), मुलगी सिंचना (34), सिंधुराणी (31), मुलगा मधुसागर (25) आणि 9 महिन्याचा नातू यांचे मृतदेह सापडले आहेत. नातू एका अंथरुणावर पडला होता. भूकेने व्याकूळ झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. सिंचनाला अडीज वर्षांची मुलगी होती. ती पोलिसांना भूकेमुळे बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला वाचविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. सिंचना ही तिच्या पतीसोबतच्या वादामुळे माहेरी आली होती. तर छोटी मुलगी प्रसुतीसाठी माहेरी आली होती. मुलगा इंजिनिअर होता, एका कंपनीत काम करत होता. पोलीस शंकरची चौकशी करत आहेत.



