चाळीसगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत


फटाक्यांची आतषबाजी, बेल – भंडाराही उधळला

चाळीसगाव : फटाक्यांची आतषबाजी, बेल, भंडाऱ्याची उधळण करत शहरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तब्बल साडेअकरा तास चाललेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुर्णाकृती पुतळ्याची मिरवणूक शहरात सिग्नल चौकात येताच जल्लोष करण्यात येऊन फटाक्यांची मनोहारी आतषबाजी करण्यात आली. रविवारी सकाळी नऊ वाजता पिलखोडपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. अग्रभागी ढोल – ताशे, डीजे होता. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यात आले. पुष्पवृष्टीही करण्यात आली. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता मिरवणूक सिग्नल चौकात पोहोचली. पुतळा बसविण्यात येणाऱ्या चबूतऱ्यासह शिवसृष्टीच्या वास्तूला शिवनेरी फाऊंडेशनच्या वतीने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यानी बेल-भंडारा उधळला.

चाळीसगावकरांची अखेर स्वप्नपूर्ती
चाळीसगावकरांची तब्बल चार दशकानंतर स्वप्नपूर्ती झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे चाळीसगाव नगरीत आगमन झाले. चाळीसगावकरांनी आपल्या राजाचे जल्लोषात, उत्साहात स्वागत केले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पदस्पर्शाने चाळीसगाव नगरी पावन झाली, अशी भावना या प्रसंगी शिवप्रेमींनी व्यक्त केली.





शिवसृष्टीचा अनुभव
या मिरवणुकीत ढोल, ताशा, लेझीम, पोवाडे, मर्दानी खेळ म्हणजे साक्षात शिवसृष्टीचा अनुभव देत होते. चाळीसगाव शहरातील हजारो शिवप्रेमी या ऐतिहासिक क्षणाची आपल्या हृदयात साठवण करीत होते. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करण्यात येत होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !