शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनसह अन्य आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली होती. आरोपींची एनसीबी कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.
#UPDATE | Mumbai court sends Aryan Khan, Arbaz Merchant and 6 others to judicial custody for 14 days in drugs seizure at cruise ship
Court says the case will now be heard by special NDPS court https://t.co/8rqko8epsc
— ANI (@ANI) October 7, 2021




ड्रग्ज तस्करीचे जाळे शोधण्यासाठी पुन्हा कोठडीची मागणी
मुंबईवरुन गोव्याला जाणार्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आली होती. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारीका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केल्यानंतर गुरुवारी या सर्व आरोपींची एनसीबी कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. एएसजी अनिल सिंग यांनी एनसीबीची बाजू मांडली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे. ड्रग्ज तस्करीचे जाळे शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज आहे. सर्व आरोपींची येत्या 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवावी, अशी विनंती सिंग यांनी न्यायालयाकडे केली. या सुनावणीदरम्यान एनसीबीचे वकील तसेच आर्यन खान आणि इतर आरोपीची बाजू मांडणारे वकील यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
आर्यनला आधी एक दिवस नंतर तीन दिवस कोठडी
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे नाव आल्यानंतर संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर आर्यनला पहिल्यांदा एक दिवस आणि नंतर तीन दिवस असे एकूण चार दिवस कोठडी सुनावण्यात आली होती. आजही एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खानसह इतर आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच यावेळी आर्यन खानसह इतर आरोपींना जामीन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी घेतली जाईल. त्याचबरोबर यावेळी एनसीबीने आपली बाजू मांडण्याचेदेखील आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र कोठडीतच जाणार असून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कोर्टाकडून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल.