अभ्यास न केल्याने शिक्षकाची मारहाण : विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली : अभ्यास न केल्याने शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शिक्षकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सालासरच्या कोलासर इथे ही घटना घडली. खाजगी शाळेत सातवीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याला निर्दयी मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. गणेश ओमप्रकाश (12) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.
शिक्षकाविरोधात खुनाचा गुन्हा
सालासर पोलीस एसएचओ संदीप बिश्नोई म्हणाले की, कोलासर रहिवासी ओमप्रकाश यांनी तक्रार दाखल केली असून ओमप्रकाश यांचा मुलगा गणेश खासगी शाळा मॉर्डन पब्लिक स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गेल्या 2-3 महिन्यापासून तो शाळेत जात आहे. गणेशनं त्याच्या वडिलांना 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं की, त्याचे शिक्षक मनोज विनाकारण त्याला मारहाण करतात. बुधवारी गणेश शाळेत गेला असता होमवर्क न करता शाळेत का आलास? म्हणून शिक्षकाचा राग अनावर झाल्याने विद्यार्थ्यास मारहाण करण्यात आली व या घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.




विद्यार्थ्यांमध्ये पसरली भीती
विद्यार्थ्याचे पालक शाळेत आल्यानंतर वर्गातील मुलांनी सांगितले की, मनोजने गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर जमिनीवर आपटून मारले. या मारहाणीत गणेशला प्रचंड मार बसला असं ते म्हणाले. कुटुंबीय शाळेत पोहचल्यानंतर जखमी अवस्थेत गणेशला सालासरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले. मृत गणेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिक्षक मनोज कुमार याच्याविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईत आरोपी शिक्षकाला अटक केली. गणेशच्या मृतदेहावर पोस्टमोर्टम करुन मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.