जनरल बिपीन रावतांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


नवी दिल्ली : तमिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्यासह लष्करातील 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री आठ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर सर्वांचे शव आणल्यानंतर या अधिकार्‍यांच्या कुटुंबियांनी अंतिम दर्शन घेतले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल बिपीन रावत यांच्यासह सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनीही रावत आणि जवानांना श्रद्धांजली वाहिली.





आज होणार अंत्यसंस्कार
दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव हे दिल्लीच्या दिल्ली के.के.कामराज मार्गावरील जनरल बिपीन रावत यांच्या सरकारी निवासस्थानी नेलं जाईल. शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव शरीर त्यांच्या सरकारी निवासस्थानी 3 कामराज मार्गमध्ये अंत्य दर्शनासाठी ठेवलं जाईल. दुपारी दोन वाजता त्यांचे मृतदेह तिन्ही सैन्य दलांच्या मिलिट्री बँडसह धौलाकुआंमधील बरार स्क्वेअरला आणले जातील. दुपारी चार वाजता धौलाकुआंच्या बरार स्क्वेअरमध्येत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

मुलीला अश्रू अनावर
रावत यांच्या मुलींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते. अन्य अधिकार्‍यांचे कुटुंबीय तसेच तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. एनएसए अजित डोवाल देखील आले होते.

चौघांच्या पार्थिवाची ओळख पटली
आतापर्यंत चार जणांच्या पार्थिवाची ओळख पटली आहे. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडिअर एलएस लिडर, लान्स नायक विवेक कुमार यांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. अन्य अधिकार्‍यांच्या मृतदेहांची ओळख त्यांच्या कुटुबियांमार्फत पटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !