केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा वादात : पत्रकाराला दमदाटी
नवी दिल्ली : केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा बुधवारी एका वादात सापडले असून उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अजय मिश्रा एका पत्रकाराला धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडिओ क्लिपमध्ये मिश्रा पत्रकारांना धमकावताना दिसतात. लखीमपूर खिरीमध्ये शेतकर्यांना चिरडण्याच्या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आशिष मिश्रांच्या भूमिकेबद्दल एसआयटीने दिलेल्या अहवालाविषयी एका पत्रकाराने मिश्रांना सवाल केला होता. एका ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन करण्यासाठी मिश्रा शहरात आले होते. त्याचवेळी पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर मिश्रा म्हणाले, दिमाग खराब है क्या बे, (तुझं डोकं फिरलंय का) या व्हिडिओत मिश्रा त्या पत्रकाराशी झटापट करताना आणि त्याला माईक बंद करण्यास सांगताना दिसत आहे. पत्रकाराविषयी आक्षेपार्ह भाषेतही ते बोलताना दिसतात. मिश्रांना पदावरून हटवावं अशी मागणी विरोधी पक्ष करत आहे.
मिश्रा यांच्याविरोधात कारवाईची मागणी
3 ऑक्टोबरला लखीमपूर खिरीमध्ये शेतकर्यांवर पूर्वनियोजित कटानुसार गाडी घालण्यात आल्याचं एसआयटीच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, पत्रकाराशी केलेल्या वागणुकीवर आणि त्यांच्या मस्तवाल वागणुकीवर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. एवढ्या ड्राम्यानंतरही मिश्रा यांना हटवलं जाणार नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान लखीमपूर खेरी येथील घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने आता आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्येही बदल केला आहे.




हत्येचा खटला चालणार !
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर आता निर्दोष हत्येऐवजी हत्येचा खटला चालणार आहे. लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रासह 14 जणांवरील चौकशीनंतर कलमांमध्ये बदल करण्यात आला आहेत. सर्व आरोपींवर जाणीवपूर्वक नियोजन करुन गुन्हा केल्याचा आरोप आहे. भादंवि कलम 279, 338, 304 काढून 307, 326, 302, 34,120 इ, 147, 148,149, 3/25/30 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.