भुसावळातील घोटाळ्यांबाबत तपासाधिकार्यांना खंडपीठात हजर राहण्याचे आदेश
शासन निधीच्या अपव्ययाची रीकव्हरी नाहीच ; माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
भुसावळ- भुसावळ पालिकेत 2014 मध्ये झालेल्या तब्बल नऊ विविध प्रकरणांमधील घोटाळ्यांबाबत पेन्शनर्स असोसिएशनचे एस.एल.पाटील यांनी गुन्हे दाखल केले होते मात्र तब्बल पाच वर्षानंतरही या गुन्ह्यात शासन निधीच्या झालेल्या अपव्ययाची रीकव्हरी झालेली नाही शिवाय कुठल्याही आरोपींना अद्यापही अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले नसतानाच तीन गुन्ह्यांबाबत तपासाधिकार्यांनी हा प्रकार गुन्ह्यात मोडला नसल्याचे प्रतिज्ञापत्र खंडपीठात सादर केल्यानंतर 23 ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंडपीठाने गुन्ह्यांच्या कागदपत्रासह तपासाधिकार्यांना खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील घोटाळे पुन्हा चर्चेत आले असून या गुन्ह्यांमध्ये अनेक माजी नगराध्यक्षांसह विद्यमान नगरसेवकांचा संशयीत आरोपी म्हणून समावेश असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नऊ प्रकरणांमध्ये अपहार झाल्याची तक्रार
भुसावळातील पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील यांनी भुसावळ पालिकेत तब्बल नऊ प्रकरणांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्यानंतर पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात रीट दाखल केल्यानंतर नऊ गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याबाबत रीट याचिका दाखल केली होती शिवाय बाजारपेठ पोलिसात सुरूवातीला नऊ गुन्हे दाखल झाल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात अनेक नगरसेवकांचे जाब-जवाब नोंदवण्यात आले मात्र पाच वर्षांच्या काळात अद्यापपर्यंत एकालाही अटक झाली नाही शिवाय शासनाच्या निधीची रीकव्हरीदेखील झाली नाही हेदेखील विशेष !
तीन प्रकरणांमध्ये तपासाधिकार्यांचे शपथपत्र
आर्थिक गुन्हे शाखेने तीन गुन्ह्यांचा तपास करताना ही प्रकरणे गुन्ह्यात मोडली जात नसल्याचे शपथपत्र खंडपीठात सादर केले होते. खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच खंडपीठाने जळगाव पोलिस अधीक्षकांना या प्रकरणांमध्ये वैयक्तिक लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. 2 ऑगस्ट रोजी पुन्हा औरंगाबाद खंडपीठात न्या.टी.व्ही.नलावडे व न्या.के.के.सोनवणे यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेच्या तपासाधिकार्यांना 23 ऑगस्ट रोजी गुन्ह्याची कागदपत्रे व तपासाचा प्रोग्रेस रीपोर्टसह हजर राहण्याचे बजावले आहे. तक्रारदार एस.एल.पाटील यांच्यातर्फे अॅड.योगेश पाटील तर राज्य शासनातर्फे अॅड.एम.एम.नेर्लिकर व सीबीआयतर्फे अॅड.एस.एस.देवे काम पाहत आहेत.
…तर नगरसेवकांच्या अडचणीत होवू शकते वाढ
भुसावळ पालिकेतील घनकचरा प्रकल्पासह, बाजार मक्ता फी, इंग्लिश स्पीकींग क्लास, विविध रस्त्यांचे डांबरीकरण यासह अन्य नऊ प्रकरणांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडून गेल्या पाच वर्षांपासून तपास सुरू असताना अद्याप कुणालाही अटक नाही मात्र आता खंडपीठाने पोलिस अधीक्षकांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर संशयीत आरोपी असलेल्या माजी नगराध्यक्षांसह आजी-माजी नगरसेवकांवर कारवाई होते वा नाही? याकडे सुज्ञ शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.