जळगावातील सेवानिवृत्ताला इन्शुरन्सच्या नावाखाली 62 लाखांचा गंडा : युपीतील तिघे जाळ्यात


जळगाव : स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन जळगावातील विद्युत कॉलनीतील सेवानिवृत्ताची तिघांनी 61 लाख 79 हजारांवर ऑनलाईन फसवणूक केली होती. या गुन्ह्यात जळगाव सायबर पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशातून त्या तिघांना बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून विविध बँकांचे 19 एटीएमकार्ड, पाच चेकबुक, पासबूक व बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. अमित रामसिंग वर्मा ऊर्फ विक्रम सुरेश (25, रा.नोएडा, उत्तर प्रदेश), राजकुमार कल्याणसिंग ऊर्फ अनुराग शर्मा (31, रा.राधा कॉलनी लालकुआ, गाझियाबाद उत्तर प्रदेश) व रवी कुमार यशपाल सिंग ऊर्फ कमलाकर रेड्डी (31, रा.जलालपूर, उत्तर प्रदेश) असे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

विविध क्रमांकावरून संपर्क साधत घातला गंडा
विद्युत कॉलनीतील सेवानिवृत्त टिकाराम शंकर भोळे (वय 88) यांना नोव्हेंबर 2017 ते 25 ऑक्टोबर 2021 या दरम्यान दीपिका शर्मा, अनुराग शर्मा व कमलाकर रेड्डी अशी नावे सांगणार्‍यांनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. त्यांनी स्वत:ची ओळख लपवली होती. आरोपींनी स्टार हेल्थ अ‍ॅण्ड अलाइड इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे नाव, लोगो असलेले व त्यावर भोळे यांचे नाव असलेले बनावट कागदपत्रे त्यांनी तयार केली होती. ती कागदपत्रे भोळे यांच्या जळगाव येथील राहत्या घराच्या पत्त्यावर पाठवली. विमा कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची आमिष दिले. पॉलिसीमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी पॅनकार्ड लिमिट वाढवणे, रकमेवरील बँक कमिशन, ना-हरकत मिळण्यासाठी वेगवेगळी कारणे भोळे यांना त्यांनी सांगितली. त्यासाठी वेळोवेळी ऑनलाइन 61 लाख 79 हजार 593 रुपये हे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन स्वीकारून भोळे यांची फसवणूक केली.





25 ऑक्टोबर 2021 रोजी झाला होता गुन्हा दाखल
भोळे यांनी तक्रार दिल्यानंतर 25 ऑक्टोबर 2021 रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनात 27 डिसेंबर रोजी पोलिस उपनिरीक्षक अंगत नेमाने, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, सचिन सोनवणे, गौरव पाटील, दीपक सोनवणे यांचे पथक दिल्ली व उत्तर प्रदेश येथे गेले होते. तेथून अमित रामसिंग वर्मा ऊर्फ विक्रम सुरेश, राजकुमार कल्याणसिंग ऊर्फ अनुराग शर्मा, व रवी कुमार यशपाल सिंग ऊर्फ कमलाकर रेड्डी या तिघांना अटक करण्यात आली.

तिघांना 12 दिवसांची सुनावली पोलिस कोठडी
पथकाने 29 डिसेंबर रोजी दिल्ली व उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्या तिघांना अटक करून जळगावला आणले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाइल, सीम कार्ड, विविध बँकांचे 19 एटीएम कार्ड, चार पासबुक, पाच चेकबुक व बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस नाईक संदीप साळवे, ईश्वर पाटील यांनी तांत्रिक सहाय्य केले. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !