सुरक्षा दलांची मोठी कारवाई : पुलवामात तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीर : जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असलेल्या तीन दहशतवाद्यांचा पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला असून एका पाकिस्तानी नागरीकाचाही यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली.
मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त
काश्मीरमधील पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याजवळून दोन एम-4 कार्बाइन्स आणि एक एके-47 रायफल आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.




अखेर दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदगाम गावामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवादी असलेल्या ठिकाणाला घेरण्यात आले. दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अखेर चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
मंगळवारीदेखील दोन कुख्यात दहशतवादी ठार
मंगळवारी चार जानेवारी रोजी, श्रीनगरमधील हरवनमध्ये लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या एका कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. सलीम पर्रे असे या दहशतवाद्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीच्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी हाफिज हा फरार झाला. हाफिज उर्फ हमजा याच्यावर बांदिपोरामध्ये दोन पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय इतरही दहशतवादी कारवायांमध्ये तो गुंतला आहे.