गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस रुळावरून घसरली : सहा प्रवाशांचा मृत्यू
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस दोमोहानीजवळ रुळावरून खाली घसरली आहे. यात आतापर्यंत सहा जणांचा जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहे. अपघातात मयत झालेल्या प्रवाशांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जलपाईगुडी जिल्ह्यात हा अपघात झाला आहे.
सायंकाळी झाला अपघात
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजता हा अपघात झाला. या अपघातात 12 बोगींचं नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याबाबत ट्वीटवरून माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “ही दु:खद घटना आहे. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, उत्तर बंगालचे DM/SP/IG घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत. रेस्क्यू ऑपरेशन आणि मदत कार्य सुरू आहे. जखमींना शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार दिले जातील. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना अपघाताच्या रेस्क्यू ऑपरेशनबाबत माहिती दिली असल्याचं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.




रेल्वे प्रशासनाची धाव
डीआरएम आणि एडीआरएम अधिकारी घटनास्थळी पोहचल्याचही रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. मदतकार्यासाठी रेल्वे आणि वैद्यकीय वॅन सुद्धा पोहचली आहे.
चौकशी समिती गठित
उत्तर-पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी गुनीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या घटनेत ज्या लोकांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींना एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्च स्तरीय चौकशी समिती बसवण्यात आली आहे.”