देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा उघड : 28 बँकांना 22 हजार कोटींचा गंडा


नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा गुजरातमध्ये उघड झाला असून एका शिपयार्ड कंपनीने 28 बँकांना 22 हजार कोटींचा गंडा घातला आहे. या संदर्भात एबीजी शिपयार्डच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने गुन्हा दाखल केला. एबीजी शिपयार्ड ही कंपनी जहाजाची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे काम करते. या कंपनीचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सूरत येथे आहेत. एबीजी शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानुसार, हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

सर्व नियम बसवले धाब्यावर
एबीजी शिपयार्ड कंपनीने सर्व नियम तोडत अनेक बँकांमध्ये फसवणूक केली आहे. फक्त बँकच नाही तर एलआयसीलाही चूना लावला आहे. एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्डने एलआयसीची 136 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे तर एसबीआयला 2468 कोटी रुपयांचा चुना लावला आहे.





इतक्या कोटी रुपयांचे कर्ज
एबीजी शिपयार्डवर सध्या एसबीआयचे दोन हजार 925 कोटी, आयसीआयसीआय बँकेचं सात हजार 89 कोटी, आयडीबीआयचं 4 हजार 634 कोटी, बँक ऑफ बडोदाचं 1 हजार 614 कोटी, पीएनबीचं 1हजार 244 कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचं 1हजार 228 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील एक घोटाळा
कंपनीचे माजी अध्यक्ष-महासंचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतर अधिकार्‍यांवर सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !