यावलमध्ये संततधार पावसातही आदिवासी बांधवांचा उत्साह ; रॅलीने वेधले लक्ष
आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणार
यावल- शहरात संततधार पाऊस सुरू असतानाही आदिवासी बांधवांनी उत्साह कमी होवू न देता पारंपरीक वाद्याच्या तालावर नृत्य करीत शहरवासीयांचे लक्ष वेधले. निमित्त होते ते आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे. निमंत्रीत विविध आदिवासी संघटना, विद्यार्थ्यांनी पारंपरीक वेशभूषांसह पारंपरीक वाद्य व नृत्य करीत येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धनश्री चित्रमंदिरापर्यंत रॅली काढली.
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणार -आमदार
सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी हे खर्या अर्थाने वनांचे मालक असून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबध्द असून काही आदिवासींना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी होत असलेला त्रास न होण्यासाठी प्रयत्न सुरू असून आदिवासींना विविध योजनांचा लाभ देवून तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचेही काम शासन प्रामुख्याने करीत असल्याची माहिती आमदार हरीभाउ जावळे यांनी येथे दिली. शुक्रवारी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रकल्पस्तरीय अध्यक्षा मीना तडवी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर सोनवणे, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आदिवासींच्या अडचणी सोडवाव्यात -प्रतिभा शिंदे
रॅलीच्या समारोपानंतर सभा झाली. यावेळी लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी संस्कृती कथन करतांना त्यांची देव-देवता, आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा, झलकारी देवी यांचेसह ऐतीहासीक क्रांतीकारक, सण, उत्सव, परंपरा, वेशभूषाबाबत सविस्तर माहिली तसेच आदिवासींच्या अडचणी कथन करत शासनाने त्या त्वरीत सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार शिरीष चौधरी, प्रभाकर सोनवणे, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, एम.बी.तडवी, मीना तडवी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.