Cylinder Explosion in Jalgaon जळगावात सिलिंडर स्फोटात आचारी ठार ; अन्य एक गंभीर जखमी
Cylinder Explosion in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील जानकी नगरात गॅस सिलेंडरचा स्फोट होवून त्यात होरपळल्याने स्वयंपाक बनवणार्या आचार्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बन्सीलाल पांडे (55, जानकी नगर, जळगाव) असे ठार झालेल्या आचार्याचे नाव आहे.




गॅस गळतीनंतर पेटले सिलिंडर
जळगाव शहरातील नेरी नाक्याजवळील जानकी नगरात बंशीलाल पांडे (55) हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आचारी म्हणून काम करतात. मंगळवार 8 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कमर्शियल गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये बन्सीलाल पांडे हे होरपळल्याने जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले बालकिसन गणेशलाल जोशी हे गंभीर जखमी झाले. जखमीस तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
वेळीच आगीवर नियंत्रण अन्यथा घडला असता अनर्थ
जानकी नगर या भागात पार्टिशनची घरे व दाट वस्ती असल्यामुळे घराला घर लागून आहेत. या सिलेंडरजवळ अजून काही सिलेंडर होती. ती शेजारील तरुणांनी बाहेर नेली नसती आणि वेळीच आग आटोक्यात आली नसत तर मोठा अनर्थ घडला असता मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग वेळीच आटोक्यात आली.
दोन बंबांनी मिळवले आगीवर नियंत्रण
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या स्वयंपाकाच्या ठिकाणी बाजूला असलेल्या 8 ते 10 सिलेंडर अजून होते. सुदैवाने काही गल्लीतील नागरीकांच्या मदतीने हे सिलेंडर बाजुला करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचार्यांनी धाव घेतली.
