स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा भंडाफोड : दोन महिलांची सुटका
ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकत उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पाच्या नावाखाली चालणार्या सेक्स रॅकेटचा उलगडा केला. दोन पीडित महिलांची सुटका यावेळी करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
घोडबंदर रोडवरील आनंदनगर, कावेसर भागातील एका स्पा सेंटरमध्ये स्पा आणि मसाज पार्लरचे मालक, तसेच त्यांचे साथीदार हे असाह्य गरीब महिलांना पैशाच्या आमिषाने फूस लावून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करून घेतात, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ली पोश युनिसेक्स स्पा सेंटरमध्ये 24 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने सापळा लावून बनावट ग्राहकाच्या मदतीने दोन महिला, तसेच एक पुरुष दलाल अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका केली. या तिघांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आणखी कोणत्या महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.



