रेल्वे प्रवाशांना इकडे लक्ष द्या ! : 29 जूनपासून रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डबे लागणार
भुसावळ : देशभरात लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या रेल्वे गाड्यांना 29 जूनपासून जनरल डबे लावण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहे. यामुळे प्रवाशांना वेळेवरही तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. लॉकडाऊनमुळे 22 मार्च 2020 पासून रेल्वे गाड्यांसह जनरल डब्यातून प्रवास बंद झाला होता. नंतर विशेष गाड्या सुरू झाल्या मात्र मेल, एक्स्प्रेसला जनरल डबे जोडलेे नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. आता 29 जूनपासून ज्या राज्यातील गाड्यांना जनरल डबे नाहीत ते जोडण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने काढले आहे.
केवळ कन्फर्म तिकीटावर प्रवास
सध्या मेल, एक्स्प्रेसला जनरल डबे नसल्याने आरक्षण तिकीट कन्फर्म झाल्याशिवाय त्यातून प्रवास शक्य नाही. अनेक प्रवासी ऑनलाइन तिकीट काढत असल्याने ते कन्फर्म न झाल्यास रद्द होते आणि आर्थिक फटका बसत आहे. अन्यथा गाडीत अशा प्रवाशांना दंड भरावा लागतो. जनरल डब्यांची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आता प्रवाशांना ऐनवेळीही साधारण तिकीट काढून प्रवास करणे शक्य होणार आहे.



