अवघ्या तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याचे मृतदेहच आढळले
परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये दाम्पत्याचे मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जोडप्याने आत्महत्या केली आहे की, त्यांचा घातपात झाला कळालेले नाही. गणेश अर्जुन अवटे व प्रियंका गणेश अवटे अशी मयतांची नावे आहेत.
घटनेने उडाली खळबळ
परभणी येथील सेलूमध्ये ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असलेल्या गणेश अर्जुन अवटे याचा विवाह तीन वर्षांपूर्वी 28 वर्षीय प्रियांका यांच्याशी झाला होता. हे दोघेही सेलुच्या राजीव गांधी नगर येथे राहत होते. आज सकाळी गणेश आणि प्रियांका दोघेही झोपेतून उठले नाहीत ही बाब गणेशच्या बहिणीच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तत्काळ ही गोष्ट त्यांच्या वडिलांना सांगितली. गणेश यांच्या वडिलांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. यावेळी घरात गणेशचा त्याच्या खोलीतील एका रॉडला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तर त्याची पत्नी प्रियांका हिचा मृतदेह पलंगावर आढळून आला. गणेश याच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.




