‘एआयएमआयएम’ कडूनही विवेक ठाकरे यांचा उमेदवारीसाठी अर्ज


बहुजन चळवळीतील चेहर्‍याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ; ठाकरेंना जागा सुटण्यासाठी आग्रह

रावेर : आगामी विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून घटक पक्ष असलेल्या दि ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादऊल मुसलमीन (एमआयएम) पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पक्ष संघटनेकडे उमेदवारीसाठी विहित नमुन्यातील अर्ज देत प्रस्ताव सादर केला आहे. वंचित आघाडीकडून धुळ्यात घेण्यात आलेल्या इच्छुकांत सुद्धा ठाकरे यांनी मुलाखत दिली तर एमआयएमकडूनही उमेदवारीसाठी त्यांनी दावा केल्याने वेगळीच चर्चा सुरू आहे. बहुजन समाजातील चेहरा, ेवीदारांच्या न्यायासाठी लढणारा नेता व सामाजिक बांधीलकी जोपासणार्‍या ठाकरेंच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी ठाकरेंनाच उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला आहे.

एमआयएम पक्षाकडून उमेदवारी अर्ज
एमआयएम पक्षाकडून 4 पासून 10 ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल. त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे कार्यालय प्रमुख शेख अहेमद इलियास यांच्याकडे विवेक ठाकरे यांनी आपला अर्ज सादर केला.एमआयएम पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा नेते फिरोज रहेमान शेख, महासचिव मुजाहिद शेख, भुसावळ शहराध्यक्ष अशरफ तडवी, सचिव कलिम शेख आणि जळगाव येथील महापालिकेतील नगरसेविका यांचे प्रतिनिधी अक्रम देशमुख हे ठाकरे यांच्या उमेदवारीचा अर्ज सादर करतांना उपस्थित होते. दरम्यान, विवेक ठाकरे हे रावेर-यावल तालुक्यातील ठेवीदारांचे नेते व जिल्ह्यातील बहुजन चळवळीतील प्रमुख चेहरा आहेत.रावेर तालुक्यातील सर्वात मोठ्या निंभोरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि पाल येथील कृषी विद्यालय आणि डेअरी डिप्लोमा कॉलेजचे संस्थापक सचिव राहिले असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

ठाकरेंच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह
वंचित बहुजन आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या एआयएमआयएम पक्षाकडून उमेदवारीची मागणी विवेक ठाकरे यांनी केल्याने मुस्लिमबहुल अशी ओळख असलेल्या रावेर विधानसभेच्या मतदारसंघातुन धोबी समाजाचे असतांना सुद्धा मुस्लिमांच्या ध्येय-धोरणांसाठी कार्यरत असलेल्या एएमआयएम पक्षाने गैर मुस्लिम म्हणून त्यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून वरीष्ठ स्तरावर आग्रह धरला जात आहे.


कॉपी करू नका.