!-- afp header code starts here -->

आदिशक्ती मुक्ताईचा अंतर्धान सोहळा उत्साहात

श्री क्षेत्र कोथळीत 725 व्या अंतर्धान सोहळ्याची गुलालाच्या कीर्तनाने सांगता : श्री संत मुक्ताईचा सर्वत्र जयघोष


मुक्ताईनगर : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चार प्रमुख धामांपैकी एक आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सोहळ्याच्या 725 व्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र कोथळी येथील मूळ समाधिस्थान जुने मंदिर बुधवार, 25 मे रोजी दिवसभर भाविकांच्या गर्दीने फुलले होते. हभप केशव दास महाराज यांचया गुलालाचे कीर्तनाने महोत्सवाची सांगता झाली. मुक्ताईचा जयघोष करण्यात आला तर पुष्पवष्टी करण्यात आली.

संतांच्या पालखीचे स्वागत
भुसावळ मुक्काम असलेल्या पालख्या बुधवारी कोथळी येथील मंदिरात सकाळी दहा वाजता टाळ-मृदुंगाच्या हरीनामाच्या जयघोषात कोथळीतील मंदिरात पोहोचल्या. प्रामुख्याने श्री क्षेत्र पंढरपूर येथून पांडुरंग परमात्मा, संत नामदेव महाराज, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज, कोंदणपुर येथून माता रुक्मिणी, आळेफाटा, जि.पुणे येथून येडेश्वर महाराज यांच्या पालखीचे मुक्ताई प्रवेशद्वाराजवळ मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. नंतर मूळ मंदिर कोथळी येथे झालेल्या अंतर्धान सोहळ्यात पांडुरंग पालखी सोहळ्याचे प्रमुख सूर्यकांत भिसे, संत नामदेव महाराज पालखी सोहळा प्रमुख केशवदास नामदास महाराज, निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख जयंत महाराज गोसावी, रुक्मिणी माता पालखी सोहळ्याचे प्रमुख सर्जेराव महाराज रेडेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख राजेंद्र दिगळे महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज प्रमुख विश्वस्त योगेश महाराज देसाई, संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा विश्वस्त त्रिकोण महाराज गोसावी यांच्यासह बंड्या तात्या कराडकर महाराज मंडळींचा मुक्ताई संस्थानतर्फे तसेच खासदार रक्षा खडसे व जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, नगराध्यक्षा मनीषा पाटील, नगरसेवक संतोष मराठे यांचा सत्कार करण्यात आला.

मुक्ताई संस्थानला धनादेश
जुन्या कोथळी मंदिरात केशवदास महाराज यांच्याहस्ते तर नवीन मंदिरात सम्राट पाटील यांनी सपत्नीक मुक्ताईची पूजा व अभिषेक केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी यांच्याकडून पाच लाखांचा धनादेश व रेडेश्वर महाराज संस्थान, आळेफाटा, जि.पुणे यांच्याकडून 15 हजारांचा धनादेश मुक्ताई संस्थानला देण्यात आला. विश्वास थांब यांच्याकडून मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी धनादेश स्वीकारले.

दोन्ही मंदिरात आंब्याची आरास
वर्षभर मुक्ताईच्या मूळ समाधीस्थळी कार्यक्रम राबविल्याबद्दल मुक्ताई संस्थानतर्फे हभप रवींद्र महाराज हरणे, विनायकराव हरणे, उद्धव महाराज जुनारे यांचा सत्कार अध्यक्ष संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी केला. मुक्ताईनगरातील नवीन मुक्ताई मंदिरात मुक्ताईला अजाबराव पाटील (वरणगाव) यांनी एक क्विंटल आंब्याची आरास तर जुन्या मंदिरात मीना पाटील (बोदवड) यांनी मुक्ताईला आंब्याची आरास दिली.

यांची सोहळ्यासाठी उपस्थिती
कार्यक्रमासाठी आलेल्या पालखी सोहळा प्रमुख यांना संत तुकाराम महाराज फाउंडेशनच्या वतीने मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष छबीलदास पाटील, सचिव सचिन पाटील उपस्थित होते. पंजाबराव पाटील, हभप रवींद्र महाराज हरणे, उद्धव जुनारे महाराज, संदीप पाटील, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे, हभप दुर्गा मराठे यांच्यासह विश्वस्त मंडळी, भाविक व वारकरी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल महाराज खोले यांनी केले.

आज पालख्या नवीन मंदिराकडे मार्गस्थ होणार
बुधवारी संध्याकाळी पाच वाजता कोथळी मंदिर प्रदशिना व रात्री साडेसात वाजता हभप जयंत महाराज गोसावी यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजता जुने कोथळी मंदिर येथून पालखी सोहळा नवीन मंदिराकडे मार्गस्थ होईल. प्रसंगी ज्ञानेश्वर माऊली यांच्याकडून मांडे तसेच खासदार रक्षा खडसे यांच्याकडून रस भाविकांना देण्यात आला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !