पत्नी विरहात पतीचीही आत्महत्या : पाचोर्‍यातील घटना


पाचोरा : सप्तपदीच्या सात फेर्‍यांसोबत उभे आयुष्य काढण्याचे वचन निभावलेल्या पतीने पत्नीचा अकाली मृत्यूनंतर स्वतःदेखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहित पत्नी गेल्याने आता जीवनात आधार शिल्लक नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. किरणबाई विष्णू पाटील (60) व विष्णू नामदेव पाटील (65, भामरे) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत दाम्पत्यावर पाचोरा येथील स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्नीचा मृत्यू : विरहात पतीची आत्महत्या
मुळचे नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले विष्णू नामदेव पाटील (भामरे, 65) हे अनेक वर्षांपासून गवंडी काम करत पत्नीचा व स्व:चा उदरनिर्वाह करीत होते. कालांतराने त्यांचे वय वाढल्याने अंगात काम करण्याची ताकद शिल्लक न राहिल्याने आणि त्यांना मुल बाळ नसल्याने पत्नी किरणबाई विष्णू पाटील ह्या लोकांच्या घरी धुणी भांडी करून पतीचे पालन पोषण करीत होत्या. गुरुवर, 26 मे रोजी थकलेल्या अवस्थेत किरणबाई ह्या दुपारी झोपल्या आणि चार वाजता विष्णू पाटील याने पत्नीला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता त्या मृतावस्थेत आढळल्या. पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहताच पतीच्या अंगातील त्राण संपले व जीवन जगण्याचा आधारच संपल्याने त्यांनी कुणाला काही एक न सांगता पत्नीच्या मृत्यूनंतर काहीच वेळात घराच्या छताला दोर आवळून आपली जीवन यात्रा संपविली.



एकाचवेळी दाम्पत्यावर अंत्यसंस्कार
विष्णू पाटील हे नगरदेवळा येथील मूळ रहिवासी असल्याने शहरात चांगले काम मिळेल या अपेक्षेने पाचोरा येथे आल्यानंतर हनुमान नगरातील दिगंबर रामदास अहिरे यांचे घरात गेल्या चार वर्षांपासून भाड्याने राहत होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता दिगंबर अहिरे यांनी टाकीत पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार सुरू केली टाकी भरल्यानंतर विष्णू पाटील यांना नळ बंद करण्यासाठी आवाज दिला. दोन तीन वेळा आवाज देवूनही विष्णू पाटील बाहेर न आल्याने त्यांचे घरात जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला असता विष्णू पाटील हे गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत तर किरणाबाई अंथरुणावर मयत अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. दाम्पत्यावर शोकाकुल वातावरणात एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !