रायपूरच्या तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील रायपूर येथे 24 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनोज राजेंद्र राजपूत (24, बेटावद, ता.जामनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मनोज राजपूत हा आपल्या पत्नीसह जळगाव तालुक्यातील रायपूर येथील मराठी शाळेजवळ भाड्याच्या घरात वास्तव्याला होता. मनोज आणि त्याची पत्नी हे दोघे एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत कामाला होते. मंगळवार, 31 मे रोजी सकाळी मनोज नाईट ड्यूटी करून घरी आला आणि पत्नीला दुचाकीने एमआयडीसीत कामाच्या ठिकाणी सोडले आणि घरी आला. त्यामुळे दुपारी मनोज घरी एकटाच होता. दरम्यान, त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

पत्नी आल्यानंतर प्रकार उघडकीस
मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मनोजची पत्नी घरी आली तेव्हा प्रकार लक्षात आला. शेजारच्यांनी मनोजला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता मयत घोषीत करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी आणि पत्नी असा परीवार आहे.







