पिंप्रीच्या वृद्धेचा विळ्याने गळ्यावर वार करून खून
पाचोरा : 80 वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यावर विळ्याने वार करून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील पिंप्री बुद्रुक उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
पाचोरा तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील रहिवासी तेजसबाई पुना जाधव या घरी एकट्याच राहतात. मंगळवार, 31 मे रोजी सायंकाळी तेजसबाई जाधव या घरी एकट्याच असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर वार करून खून केला. दरम्यान, सायंकाळपर्यंत तेजसबाई जाधव यांच्या घराचे लाईट का लागले नाही असा प्रश्न गावातील नातेवाईकांना पडला. त्यांनी घरात जावून पाहिले असता तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून खून केल्याचे निदर्शनास आले. वृध्द महिलेच्या छातीवर विळा पडलेला दिसून आला. खुनाची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली.

पोलिस अधिकार्यांची धाव
80 वर्षीय वृध्द महिलेचा खून का करण्यात आला याचे कारण गुलदस्त्यात आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भारत काकडे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलिस स्टेशनचे किसनराव पाटील यांच्यासह पथक दाखल झाले असून कसून चौकशी सुरू आहे. मयत वृध्द महिलेच्या पश्चात दोन मुले आहेत.







