भुसावळातील बेपत्ता विवाहितेचा थाळनेरनजीक मृतदेह आढळला


सोशल मिडीयावरून पटली ओळख ; शहरात हळहळ

भुसावळ : शहरातील दत्त नगरातील रहिवासी इंदू सतीश कावळे (45) या बेपत्ता विवाहितेचा दोन दिवसानंतर अखेर शोध लागला असून शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांच्या हद्दीतील कुरखळी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला आहे. सोशल मिडीयावरून केलेल्या आवाहनानंतर या बेपत्ता महिलेची 12 तासात ओळख पटली.

सोशल मिडीयावरून पटली ओळख
इंदुबाई कावळे या शुक्रवारी रात्री घरातून निघून गेल्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध सुरू असतानाही त्या न आढळल्याने बाजारपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती तर शनिवारी रात्री इंदुबाई यांचा मृतदेह थाळनेर (ता.शिरपूर) येथील कुरखळी नदीपात्रात शनिवारी रात्री आढळल्यानंतर पोलिस पाटील वसंत बिल्हाळे यांनी थाळनेर पोलिसात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखी महिलेचे ओळख पटवण्यासंदर्भात थाळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी सोशल मिडीयावर आवाहन केल्यानंतर 12 तासात मृताच्या नातेवाईकांनी महिलेला ओळखले होते. रविवारी सायंकाळी शिरपूर येथे मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.


कॉपी करू नका.