अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर : त्रिकूटाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा
Illegal sand transport in Arani: A case has been filed against The Trio In The Taluka Police
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला ऊत आला आहे. त्यातच जळगाव तालुक्यातील नागझिरी शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करतांना तीन ट्रॅक्टर दिसून आले. जळगाव महसूल विभाग कारवाई करत असतांना वाळू खाली करून वाहने घेवून पसार झाल्याची घटना घडली. याबाबत शनिवार, 16 जुलै रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पथकाला पाहताच केले पलायन
गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. या अनुषंगाने जळगाव तहसील कार्यालयाचे मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, अशिष वाघ, दिनेश उगले, अजिंक्य आंधळे, रमेश वंजारी, मोहाडी तलाठी सारीका दुरगंडे, धामणगाव तलाठी रविंद्र घुले, तरसोद तलाठी अनिरूध्द खेतमाळस, खेडी खुर्द तलाठी रूपेश ठाकूर, पिंप्राळा तलाठी संदीप डोभाळ यांनी नागझीरी शिवारातील गिरणा नदी पात्रात धड कारवाई केली. यावेळी तीन ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीर विना परवाना वाळूची चोरटी वाहतूक करत असतांना आढळून आले. महसुल पथकाला पाहून ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील वाळू खाली करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेवून पसार झाले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी पिंप्राळा मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक गजानन सोनवणे उर्फ मेजर सोनवणे (रा. मोहाडी रोड, जळगाव), देविदास बबन ढेकळे (रा. मोहाडी रोड, जळगाव) आणि संदीप गिरधर सपकाळे (रा.मोहाडी, ता.जळगाव) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे.