तापी नदीपात्रात इलेक्ट्रिक शॉक लागल्याने पुरीतील तरुणाचा मृत्यू


Youth from Puri dies due to electric shock in Tapi riverbed खिर्डी : रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे शिवारातील तापी नदी पात्रात इलेक्ट्रिक मोटरचे काम करताना शॉक लागल्याने पुरी गावातील शुभम विजय गोंड (24) या युवकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवार, 1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.

पुरी गावात हळहळ
पुरीतील शुभम गोंड हा तरुण शनिवारी सायंकाळी तापी नदीपात्रात इलेक्ट्रीक मोटार पंप दुरुस्त करीत असताना त्यास शॉक लागल्याने तो तापी पात्रात बुडाला. त्यानंतर रविवारी सकाळी 11 वाजता तरुणाचा ज्ञानेश्वर बेलदार यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. पुरी गावातील पोलिस पाटील किरण पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश सूर्यवंशी, पोलिस नाईक ईश्वर चव्हाण करीत आहे.