विवाहितेने मुला-मुलीसह केली आत्महत्या


A married woman committed suicide with her son and daughter सिन्नर : विवाहितेसह तिच्या दोन मुलांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरा, सासू, दीर व जावू अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पती, सासरा व सासू या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. तालुक्यातील मोह शिवारात 30 वर्षींय विवाहिता ज्योती विलास होलगिर, त्यांची मुलगी गौरी विलास होलगिर (10) व मुलगा साई विलास होलगिर (8, रा.मोह, ता.सिन्नर) यांनी आत्महत्या केली.

सासरच्या मंडळींचा जाच असह्य
मयत विवाहितेचा भाऊ सुनील चिंधू सदगीर (26, रा.हिसवळ) याने मयत ज्योतीच्या सासरच्या पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. सासरच्या लोकांकडून लग्न झाल्यापासून माहेरुन एक लाख रुपये आणावे या कारणासाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पती विलास पांडुरंग होलगिर, सासरा पांडुरंग कारभारी, सासू फशाबाई, दीर अमोल व जाव सुनिता अमोल होेलगिर या पाच संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पाझर तलावात आढळले मृतदेह
रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास ज्योती होलगिर, गौरी आणि साई या तिघांचे मृतदेह मोह शिवारातील पाझर तलावात आढळले. मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी पती विलास, सासरा पांडुरंग व सासू फशाबाई या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, मोह येथे मयत विवाहिता ज्योती, मुलगी गौरी व मुलगा साई या तिघांवर अंत्यसंकार करण्यात आले.