भुसावळात गणपती मूर्ती प्रशिक्षण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा महिला मंडळ व सोनिच्छा ड्रॉईंग क्लासेसचा संयुक्त उपक्रम
भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ व सोनिच्छा ड्रॉईंग क्लासेसच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी संतोषी माता हॉलमध्ये झालेल्या विनामूल्य कार्यशाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
आमदारांनी साधला चिमुकल्यांशी संवाद
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. त्यांनी सर्व बाल-गोपाळांशी मोकळा संवाद साधला. पर्यावरणाला पूरक शाडू मातीची गणपतीची मूर्ती लहान मुलांनी बनवणे व त्याच मूर्तीची पालकांनी स्थापना केल्यास विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना या माध्यमातून वाव मिळेल व पर्यावरण पूरक गणेशोउत्सव साजरा करण्याचे संस्कार मुलांवर होईल म्हणून याच मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले.
शाडू मातीच्या मूर्तीला प्रथम स्थान द्या -रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविात कार्यशाळेच्या उद्देश सांगताना उपलब्ध संधीचा उपयोग करून पाण्यात विरघळणार्या व प्रदूषणरहित शाडू मातीची मूर्तीच्या स्थापनेला प्रथम स्थान द्यावे व सुंदर मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. खिरोदा येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल मालखेडे यांनी मुलांना साध्या व सोप्या पद्धतीने मूर्ती कशी बनवतात याचे प्रशिक्षण दिले. दरम्यान, व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सावकारे, अतुल मालखेडे, रजनी सावकारे, जयश्री चौधरी उपस्थित होते. मंडळाच्या सदस्या सपना जंगले, रीया पिंपळे, वैशाली भदाणे, पारस, प्रेरणा, किरतेस,कार्तिकेय, निकिता व नक्षत्र यांचे सहकार्य लाभले. आभार अलका भटकर यांनी मानले.
