संततधार पाऊस : हुतात्मा एक्स्प्रेस चार दिवस रद्द
मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत ; मंगला एक्स्प्रेस रद्द तर महाराष्ट्र एक्स्प्रेस मिरजेपर्यंत चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय
भुसावळ : मुंबईतील पावसामुळे अप हुतात्मा एक्स्प्रेस 16 पर्यंत तर डाऊन मार्गावरील गाडी 15 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली असून महाराष्ट्र एक्स्प्रेस मिरजेपर्यंत चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा रद्द
अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून ाऊन मार्गावरील पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान रद्द करण्यात आल्याने खान्देशातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागणार आहे. त्या शिवाय अप निजामुद्दिन एरणाकुलम मंगला एक्स्प्रेस ही गाडी सोमवार, 12 ऑगस्ट रोजी निजामुद्दीन स्थानकावरून रद्द करण्यात आली तर या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालेल्या एर्नाकुलम निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस यागाडीचा मार्ग बदल करण्यात आला आहे. ही गाडी पलक्कड, शेरानपूर, इरोड, गुडूर, विजयवाडा, नागपूर, इटारसी या मार्गे निजामुद्दीनन येथे पोहोचणार आहे.
मिरजेपर्यंत महाराष्ट्र एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय
डाऊन (11029) कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी सोमवारी कोल्हापूरऐवजी मिरज रेल्वे स्थानकावरून सुटणार असून ती केवळ गोंदीयापर्यंत धावणार आहे तर रविवारी अप (11040) गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी मिरज स्टेशनपर्यंत चालविण्यात आली व तेथून ती माघारी वळवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही गाडी गोंदिया सेमिरज स्टेशनपर्यत चालविली जाणार आहे, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळवले आहे.