डोणगावच्या इसमाचा अपघाती मृत्यू

यावल : तालुक्यातील डोणगाव येथील 55 वर्षीय इसमाचा आडगाव-चिंचोली रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. बुधवारी आडगाव येथील यात्रा असल्याने सुरेश बोमटू भालेराव (55, रा.डोणगाव) हे यात्रा पाहण्यासाठी गेले मात्र घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते आडगाव- चिंचोली रस्त्यावर गुरूवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. पायी येत असतांना एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना मागुन जबर धडक दिल्याने त्यांचा उजवा पाय मोडला गेला तर डोक्यातून जबर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी अपघातात दुचाकीचे तुटलेले साहित्य पडलेले आढळले. घटनास्थळी पोलिस कर्मचारी विकास सोनवणे हे दाखल होत मयत भालेराव यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी विकास सोनवणे करीत आहे.


