गावठाण हद्द निश्‍चित करण्यास विरोध : पोलिस प्रशासनाला निवेदन


यावल : तालुक्यातील स्थलांतरीत गाव असलेले पथराळे येथील शासनाने संपादन केलेल्या गावठाणाची हद्द शुक्रवारी निश्‍चित करण्यासाठी भूमी अभिलेखा कर्मचारी गेले असता मोजणीस थोरगव्हाण येथील एका चौधरी कुटूंबियांने शासनाने जमीन बेकायदेशीर संपादन केल्याचे सांगत न्यायालयाचा आमचे बाजुने निकाल असल्याचे सांगत तहसीलदार कार्यालयाकडून फेरफारसाठी आमचे प्रकरण प्रलंबीत असल्याचे सांगीतले. चौधरी कुटूंबियाने गावठाण हद्द निश्‍चित करू देण्यास विरोध केल्याने शिरागड/पथराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचासह पथराळे येथील सुमारे 100 ग्रामस्थांनी येथील पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे व तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन सादर केले.

गावठाण जमीन मोजणीला विरोध
तालुक्यातील पथराळे हे गाव 1959 मध्ये तापी नदीच्या पुरामुळे स्थलांतरीत केले आहे. शासनाने संपादन केलेल्या गावठाणावर बेघरसाठी प्लाट देण्यासाठी ग्रामपंचायत थोरगव्हाण/पथराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण हद्द निश्‍चितीसाठी भूमी अभिलेखा कार्यालयाकडे अर्ज केला होता त्यानुसार भूमी अभिलेखा कार्यालयाचे दोन कर्मचारी मोजणीसाठी गावठाणावर आले असता त्यांना थोरगव्हाण येथील ईश्‍वर संजयसिंग चौधरी, विजय नवल चौधरी, मंगल चौधरी, नवल देवराम चौधरी व सतीष नवल चौधरी यांनी विरोध करत आमची वडीलोपार्जीत शेती असल्याचे सांगून तहसीलदार कार्यालयाकडे आमच्या नावे करण्यात येत असेलल्या नोंदीचा अर्ज प्रलंबीत असल्याचे सांगत गावठाण मोजणीस विरोध केला. या प्रकरणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता प्रताप सोनवणे व सुमारे 100 ग्रामस्थांनी यावल पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे व तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन दिले. याप्रसंगी प्रताप सोनवणे, गणेश धीवर, अविनाश धीवर, ईश्वर भालेराव, मधुकर सुरवाडे यांच्यासह सुमारे 100 च्या वर ग्रामस्थ येथे आले. निवेदनावर 250 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. दरम्यान, ग्रामसेवक भरत पाटील यांनी याबाबत नेमके प्रकरण काय आहे यासाठी तहसीलदार , गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन घेवून पुढील निर्णय ग्रामपंचायत घेईल, असे सांगितले.


कॉपी करू नका.