विवाहितेशी प्रेमसंबंध : जळगावात तरुणाचा खून करून मृतदेह रेल्वे रूळावर टाकला

जळगाव : विवाहितेशी असलेल्या प्रेमप्रकरणातून जळगावातील तरुणाचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याची घटना घडली होती. कुटुंबियांनीदेखील तरुणाचा खून झाल्याचा आरोप केल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये गुन्ह्याचा उलगडा केला आहे. प्रेमसंबंधातूनच विनोदचा खून करणार्या विवाहितेचा पती कैलास राजेश महाजन व भाऊ विलास राजेश महाजन या दोघा सख्या भावंडांना पोलिसांनी अटक केली आहे.
मोबाईलवरून पटली तरुणाची ओळख
शिरसोली जळगाव रेल्वे लाईनवर खंबा क्रमांक 415/13, 415/15 येथे तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर तरुणाजवळील मोबाईलमधील क्रमाकांवर संपर्क साधला असता, तो त्याच्या अकोला येथील मावसआजीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालय गाठल्यानंतर मयत हा हरीविठ्ठल नगरातील विनोद महाजन असल्याचे समोर आले. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
विवाहितेशी प्रेमसंबंध : तरुणाचा गेला बळी
संशयीत आरोपी कैलास व विलास हे दोन्ही भाऊ एमआयडीसीतील कंपनीत कामाला असून ते हरीविठ्ठल नगरातच राहतात. याच ठिकाणी वास्तव्यास असलेला विनोद महाजन याचा संशयित कैलास व विलास यांचा लहान भावाचा मित्र बनला. त्यामुळे विनोदचे त्याच्या घरी येणे जाणे सुरू झाले. यातून विनोद व मित्राची वाहिनी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रेमसंबंध सुरू होते तर विनोदचे येणे जाणे वाढल्याने कैलासला संशय आला. त्याने याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केल्यानंतर विनोदच्या मित्राने थेट विवाहिता व विनोद यांच्या दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप मिळवून कैलास याला ऐकविली. ही क्लिप ऐकल्यावर कैलासवर विनोदच्या खूनाचे भूत स्वार झाले. ऑडिओ क्लिप ऐकविणार्या मित्राचाच वापर करुन कैलासने भाऊ विलाससोबत खूनाचे नियोजन केले. ठरल्यानुसार विनोदला त्याचा मित्र बहाण्याने शुक्रवारी सायंकाळी तांबापुरा येथे घेवून गेला. याठिकाणी आधीच कैलास व विलास उभे होते. दोघांनी विनोदला ताब्यात घेत, आपल्या घरी नेले. घरी नेल्यावर कैलास व विलास दोघांनी विनोदची समजूत काढली. यानंतर खूनाचे भूत स्वार झालेल्या कैलासने रुमालाले विनोदळा गळा आवळला. विनोद मेल्याची खात्री केल्यावर यानंतर दोघांनी मृतदेह पोतडीत टाकत रात्री 11 वाजेच्या सुमारास रीक्षातून रेल्वेलाईन गाठून रुळावर मृतदेह टाकून दिला. याठिकाणी धावत्या रेल्वेखाली येवून त्याच्या शरीराचे तुकडे झाल्याचे समोर आले आहे. कुटुंबियांनी आरोप केल्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची दखल घेतली. व तपासाच्या सुचना केल्या. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील शरद पाटील, संतोष गीते, सहाय्यक पोलीस निरिक्षक राठोड यांनी गुन्ह्याचा उलगडा गेला. यानंतर रविवारी दोघा भावंडांना एमआयडीतील काम करत असलेल्या कंपनीतून ताब्यात घेतले.


