पुण्यातील दरोड्यात लुटलेले दागिने निघाले बेंटेक्सचे


जळगाव : पुण्यातील पेठे ज्वेलर्समध्ये रीव्हहॉलरच्या धाकावर 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी शनिवारी सुशील अशोक मगरे (रा.पहूर, ता. जामनेर) व त्याचा साथीदार नीतीश उर्फ अमित प्रसाद चौधरी (20, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव, मुळ रा.बिहार) या दोघांना बडोदा येथून अटक केली आहे. दरम्यान, आरोपींनी लुटलेले दागिणे सोन्याचे नव्हे तर बेंटेक्सचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरोड्यादरम्यान पिस्तुलचा धाक दाखवत असताना ज्वेलर्समधील कामगारांनी बेंटेक्सचे दागिणे दोघांना काढून दिले तर खरे दीड किलो सोने पायाच्या खाली ठेवले होते, ते सुरक्षित राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.

वॉचमनच्या घरात लपवले दागिने
सुशील मगरे व नीतीश या दोघांनी जळगाव शहरात आल्यानंतर सराफाकडे काम करणार्‍या बंगाली कारागिराकडे नेले होते. तेव्हा हे सोने बनावट व बेंटेक्सचे असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींनी यांच्या संपर्कात आलेला वॉचमन याच्या कोल्हे हिल्स परीरसरातील फार्म हाऊसनजीकच्या घरातील ड्रेनेजच्या पाईपात लपविले होते. पोलिस निरीक्षक बापू रोहोम, सहायक फौजदार चंद्रकांत पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने घरझडती घेऊन घरातील व्यक्तीला बोलते केले असता त्याने रुमालात बांधून ठेवलेले हे सोने काढून दिले. त्यात 51 हजार, 6 पाटल्या व 11 मोतीच्या बांगड्यांचा समावेश आहे.

आरोपीने दिला बनावट पत्ता
सुशील मगरे व त्याचा साथीदार पुण्यातील सराफ दुकान व शिवाजी नगरातील एका ठिकाणी तसेच दिल्ली येथे मोबाईल सीमकार्ड घेताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तसेच सीमकार्ड घेताना दिल्लीचा बनावट पत्ता देवून आधारकार्ड मात्र जळगावचे दिले होते. दरम्यान, हे सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या चार राज्यात मगरे याने जळगाव पोलिसांना चकवा दिला.


कॉपी करू नका.