भुसावळकर रातरागिणी एकवटल्या : केली अंधारावर मात

मौन सोडू चला बोलू : प्रचंड उत्साह, घोषवाक्यांच्या आवाजाने भेदले अंधाराचे साम्राज्य : दिव्य मराठीच्या उत्सवात महिलांचा आवाज झाला बुलंद
भुसावळ : ‘दिव्य मराठी’च्या मौन सोडू चला बोलू या अभियानंतर्गत रविवार, 22 रोजी रात्री 9.30 वाजता भुसावळ शहरात रातरागिणींचा नाईटवॉक काढण्यात आला. शहरातील ‘दिव्य मराठी’ कार्यालय ते जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत निघालेल्या या नाइटवॉकमध्ये गृहिणी, प्राचार्या, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, शिक्षिका, उद्योजिका, विद्यार्थिनी, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांसह बचत गटाच्या सदस्या मिळून सुमारे 1200 महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. पाच महिलांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून या शानदार कार्यक्रमाचे उद्घघाटन झाले. रॅलीच्या मार्गावर संस्कृती फाउंडेशनचे पथनाट्य, सेल्फ डिफेन्सच्या ट्रिक्समधून सहभागी महिलांचे मनोबल वाढले. घरोघरी ज्ञान देणार्या दिव्य मराठीने रातरागिणी नाइटवॉकद्वारे महिलांना सन्मान उंचावल्याच्या प्रतिक्रिया शेकडो महिलांनी व्यक्त केल्या.
विचार मंचावर यांची उपस्थिती
दिव्य मराठी कार्यालयासमोर झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या मंचावर भुसावळचे डीवायएसपी गजानन राठोड, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, भुसावळ एस.टी. डेपोतील वाहक भावना शिंपी, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका खैरनार आणि महाराष्ट्र शासनाच्या सेल्फ डिफेन्सच्या ट्रेनर प्रेमलता जोनवाल, महिला क्रीडा मंडळाच्या आरती चौधरी, नाहाटा कॉलेजच्या प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, विधित्ज्ञ अॅड. जास्वंदी भंडारी, राजस्थानी समाजाच्या अध्यक्षा मंगला कोटेचा, अखिल भारतीय मारवाडी महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा भारती राठी, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सुजाता केळकर आदींची उपस्थिती होती. दिव्य मराठी परीवारातील सदस्यांनी उपस्थितीत मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत केले. यानंतर अखिल भारतीय मारवाडी ग्रुपच्या जिल्हाध्यक्षा भारती राठी, जयश्री भराडीया, मनीषा काबरा या महिलांच्या पथकाने स्वागत गीतातून नारीशक्तीचा सन्मान केला.
पाच महिलांच्या हस्ते मशाल पेटवून रॅलीला सुरुवात
शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञा डॉ.सुजाता केळकर यांनी स्त्रीशक्तीपर गीत सादर करून महिलांचे मनोबल वाढवले. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, सेल्फ डिफेन्सचे ट्रेनर गोपाळ जोनवाल आदींनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर, भुसावळ एसटी डेपोतील वाहक भावना शिंपी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका खैरनार आणि सेल्फ डिफेन्सच्या ट्रेनर प्रेमलता जोनवाल या पाच महिलांच्या हस्ते मशाल पेटवून रॅलीला सुरुवात झाली. सूत्रसंचालन नाहाटा महाविद्यालयाच्या प्रा.राजश्री देशमुख, प्रास्ताविक रीपोर्टर श्रीकांत सराफ, तर आभार यावलचे प्रतिनिधी शेखर पटेल यांनी मानले. रातरागिनी नाइटवॉकच्या यशस्वितेसाठी शहरातील सर्व महिला मंडळे, दिव्य मराठी परिवाराच्या सदस्यांनी सहकार्य केले.
खर्या अर्थाने अंधारावर मात
शहरातील रॅलीच्या मार्गावरील गांधी पुतळा ते शहर पोलिस ठाणे व जामनेर रोडवरील बहुतांश पथदिवे नेहमी प्रमाणे बंद होते. यामुळे काही ठिकाणी रॅलीतील सहभागी महिलांना वास्तव्यात अंधाराला भेदून जावे लागले. कार्यक्रमाचे उद्धघाटनस्थळ असलेले दिव्य मराठी कार्यालय व समारोपाचे ठिकाण अष्टभुजा देवी मंदिराजवळ दिव्यांचा लखलखाट असला तरी रॅलीच्या मार्गात काही ठिकाणी अंधार असल्याने ‘आम्ही अंधाराला भेदून निघालो’, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.
ढोलताशांचा गजर, घोषवाक्यांचा गगनभेदी आवाज
रातरागिनी मशाल रॅलीत सखी श्रावणी महिला मंडळाच्या स्वररागिणी ढोलताशा पथकाने रंगत भरली. ढोल ताशांचा गजर व महिलांच्या गगनभेदी घोषणांनी भुसावळशहर दणादले. रॅलीत सहभागी युवतींच्या हातातील लक्षवेधी घोषणाफलक महिला अत्याचार व महिलांच्या शोषण करणार्या समाज व्यवस्थेबद्दल निर्माण झालेली चिड व्यक्त करत होत्या. महाविद्यालयीन युवतींनी स्वयंपूर्तीने घोषणाफलक घरुनच तयार करुन आणले होते.
प्रशासन, पोलिस विभागाचे अतुलनिय सहकार्य
दिव्य मराठीच्या रातरागिनी मशाल रॅलीसाठी भुसावळ शहर, बाजारपेठ व वाहतूक शाखेने मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले. यासोबतच रातरागिणी मशाल रॅलीस प्रशासनाची साथ मिळाली आहे. प्रांताधिकारी डॉ. रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धिवरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर, पोलिस गोपनीय विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांचे सहकार्य मिळाले. दरम्यान, उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्य मराठी ब्युरो चीफ हेमंत जोशी, विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी, वरीष्ठ उपसंपादक गोपाळ रोकडे, रीपोर्टर श्रीकांत सराफ, जाहिरात विभागप्रमुख ललित नेहते, संजय ठाकूर, राहुल सोनवणे, शैलेंद्र पाटील आदींसह दिव्य मराठी परीवारातील सदस्यांनी परीश्रम घेतले.


