एरंडोलनजीक भीषण अपघात : आठ प्रवासी ठार

अपघातात एरंडोलमधील सहा जणांचा मृत्यू : एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश : अपघातप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
एरंडोल : भरधाव ट्रक प्रवासी घेवून निघालेल्या कालीपिलीवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकासह आठप्रवाशांचा मृत्यू झाला तर आठ प्रवासी जखमी झाले. सोमवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ट्रकचा स्टेअरींग रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातात एरंडोल शहरातील सहा प्रवाशांचा समावेश असून एकाच कुटुंबातील तिघे ठार झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
स्टेअरींग रॉड तुटल्याने ट्रक आदळला कालीपिलीवर
एरंडोल शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या हॉटेल गौरीजवळ धुळ्याकडून जळगावकडे जाणार्या ट्रक क्रमांक (एम.एच.15 जी.8474) चा स्टेअरींग रॉड तुटल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक एरंडोलकडे जाणार्या कालीपिली क्रमांक (एम.एच.19 वाय 5207) वर आदळल्याने आठ जण ठार झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले .
अपघातात आठ प्रवाशांचा ओढवला मृत्यू
निवृत्ती प्रभाकर ढाकणे (45), उज्ज्वला निवृत्ती ढाकणे (38), प्रसन्न निवृत्ती ढाकणे (10) या एकाच कुटुंबातील तिघांसह कालीपिली चालक नितीन उर्फ पिंटू सोनार (42), परमेश्वर नाना माळी (23), भानुदास जाधव (55, सर्व रा.एरंडोल), काशीनाथ शंकर पाटील (72, रा.चिमणपुरी पिंपळे, ता.अमळनेर) यांच्यासह एक 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा समावेश आहे. अपघातात दैव बलवत्तर म्हणून म्हणून तीन वर्षांची बालिका सीमरन दुधभानसा खुसराम (सोंधनी छिंदवाडा, मध्यप्रदेश) ही सुखरूप बचावली आहे.
आठ जखमींवर जळगावात उपचार
मिठाराम सखाराम आरके (56, रा.एरंडोल), यासिन तडवी (35, रा. एरंडोल), तुळसाबाई संजय महाजन, गिताबाई रघुनाथ देशमुख, विजय आनंदा सोनवणे (20), राजेंद्र आनंदा सोनवणे (वय 22, दोघे रा. जवखेडा, ता. एरंडोल), दुधभानसा खुसराम (26) व फुसीबाई सुरेश कुमार (45, दोघे रा. छिंदवाडा) या आठ जखमी प्रवाशांवर जळगावातील खाजगी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णवाहिकेचा दरवाजा लॉक झाल्याने संताप
एरंडोलजवळ झालेल्या अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रुग्णवाहिकेचा दरवाजा लॉक झाल्यानंतर आसारी कापण्याचे कटर आणल्यनंतर दरवाजा कापून रुग्णांना बाहेर काढण्यात आले. यात पाऊण तास वाया गेला. यावेळेत रुग्णवाहिकेतील रुग्ण प्रचंड विव्हळत होते. त्यांना होणार्या त्रासाला पाहून रुग्णालयात उपस्थित असलेले नागरीक, मदतनीस यांच्या अंगावर काटा आला होता. पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर दरवाजा कापण्यात यश आले. यानंतर रुग्णांना बाहेर काढून उपचार सुरू करण्यात आले.
पोलिसांनी घेतली धाव
अपघाताचे वृत्त समजताच एरंडोलचे पोलिस निरीक्षक अरुण हजारे, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते, निलेश ब्राह्मणकर, अखिल मुजावर, भाजपाचे उत्तर संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, नगरसेवक मनोज पाटील, उपनगराध्यक्ष बबलू चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, पराग पवार, तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन, नगरसेवक अस्लम पिंजारी, अॅड.अहमद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.


