भुसावळात अमृत योजनेला दिरंगाई ; एमजीपी सचिवांना कामाला गती देण्याचे आदेश


आमदार संजय सावकारेंच्या तक्रारीची दखल ; खराब रस्त्यांमुळे लोकप्रतिनिधींविषयी वाढला संताप

भुसावळ : नोव्हेंबर 2017 पासून शहरात केंद्र शासनाच्या महत्वांकाक्षी योजना असलेल्या अमृत योजनेच्या प्रकल्पाचे अवघे 37 टक्के काम झाल्याने आमदार संजय सावकारे यांनी नगरविकास विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानुषंगाने नगरविकास विभागाचे सहसचिव पां.जो.जाधव यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना 7 ऑगस्टच्या पत्रान्वये तातडीने हा तिढा सोडवून योजनेच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अमृत योजनेमुळे शहरात सर्वत्र खड्डे झाल्यानंतर साधी डागडूजी करण्याचे धाडसही सत्ताधार्‍यांनी न दाखवल्याने नागरीकांचा प्रचंड रोष वाढला असून आमदारांना नागरीकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाने किमान आतातरी जागे व्हावे व शहरातील रस्त्यांची डागडूजी करावी, अशी माफक अपेक्षा शहरवासी व्यक्त करीत आहेत.

दोन वर्षानंतरही अवघे 37 टक्के काम
जळगावसह भुसावळातील अमृत योजनेचे काम जळगावच्या जैन एरीगेशन कंपनीने घेतले आहे मात्र नोव्हेंबर 2017 नंतरही एकूणच भौतीक योजनेचे अवघे 37 टक्के काम पूर्ण झाले आहे तर शहरातील 12 जलकुंभासह शहरात पाईप लाईन अंथरण्यात आल्यानंतर जेसीबीने दबाई करणे क्रमप्राप्त असतानाही ती न झाल्याने पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरीकांचा रोष वाढत आहे. आमदारांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर एमजीपी सचिवांना तातडीने संबंधित विभागाची व कंत्राटदाराची बैठक घेवून कामाला गती द्यावी, असे आदेश नगरविकास विभागाच्या सहसचिवांनी दिले आहेत.

शहरभर खोदले रस्ते ; नागरीकांच्या रोषाचा मला करावा लागतोय सामना -आमदार संजय सावकारे
भाजपाचे सत्ताधारी आमदार संजय सावकारे म्हणाले की, अमृत योजनेमुळे शहरभर रस्ते खोदण्यात आले, त्याचा शहरवासीयांना मनस्ताप होत असून नागरीकांच्या रोषाचा मला सामना करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराकडून वेळेवर काम पूर्ण झाले नसल्याने आता नगरसविकास सहसचिवांनी एमजीपीच्या सचिवांना बैठक घेण्याचे आदेश दिले असून लवकरच कामे मार्गी लागतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


कॉपी करू नका.