रावेर रेल्वे स्थानकाचा भुसावळ डीआरएम गुप्तांनी घेतला आढावा


27 रोजी रेल्वे महाप्रबंधक दौर्‍यावर : भुसावळ विभागातील स्थानके चकाचक

रावेर : भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी रेल्वे महाप्रबंधकांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी रावेर रेल्वे स्थानकाला भेट देऊन स्वच्छता, सुरक्षितता, प्रवाशांच्या समस्या व केलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत भुसावळ विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. शुक्रवार, 27 रोजी रेल्चेचे महाप्रबंधक मित्तल यांचा भुसावळ विभागाचा दौरा निश्चित आहे. या दौर्‍यावेळी ते रावेर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी सांगितले.

रावेर रेल्वे स्थानकावर विकासकामांना वेग
गेल्या महिनाभरापासून येथील स्टेशनवर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत. संपूर्ण स्टेशनला रंगरंगोटी करण्यात आली असून सर्व सूचना फलक व गाड्यांचे वेळापत्रक अद्यावत करण्यात आलेले आहे. डीआरएम यांनी मंगळवारी येथे दिलेल्या भेटीत प्लाटफार्मची पाहणी करीत संपूर्ण स्टेशनवरील साफसफाई व स्वच्छतेसह सुरक्षेचीही पाहणी केली. तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ सुरू असलेल्या बांधकामाची तसेच प्रवाशांसाठी उभारण्यात येणार्‍या टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग स्थळाच्या बांधकामाची पाहणी केली. स्टेशनवर उभारण्यात येणार्‍या प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणाच्या सूचना यावेळी त्यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांना दिल्या. तसेच रीले रूम, प्रवासी जिना, पुरुष व स्त्री प्रवाशांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र प्रतीक्षालायाच्या कामाची पाहणी करून तत्काळ काम संपविण्याच्या सूचना विवेककुमार गुप्ता यांनी सोबत आलेल्या वरीष्ठ अधिकार्‍यांना दिल्या. सुमारे पाऊण तास डीआरएम गुप्ता यांनी रेल्वे स्टेशनची पाहणी केली.

महिलांनी मांडला समस्याचा पाढा
डीआरएम गुप्ता पाहणी करून परत येत असतांना स्टेशना लागून रहिवास करणार्‍या महिलांना स्वच्छतेबद्दल विचारताच महिलांनी तक्रारीचा पाढा वाचला. बाहेर लाईट नसतो, अस्वच्छते मुळे खुप मच्छर झाल्याची तक्रार त्यांनी डीआरएम यांच्याकडे मांडली.

मोकाट कुत्र्यांमुळे प्रवासी त्रस्त
रावेर रेल्वे स्टेशनवर मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढला असून डीआरएम यांच्या दौर्‍यातही त्याचा प्रत्यय आला. रेल्वे स्थानकांच्या जीन्यावर कुत्रे निर्धास्त झोपल्याचे पाहून रेल्वे अधिकार्‍यांची एकच तारांबळ उडाली.

डीआरएम यांना दिले निवेदन
रावेर रेल्वे स्टेशनला विविध गाड्यांना थांबा मिळावा, पॅसेंजर गाड्यांची समस्या सुटावी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोरकर, युवराज महाजन, सुभाष अकोले, भास्कर राणे, बापू कासार, शेख रहीम पेंटर, एकनाथ पाटील आदींनी यावेळी निवेदन दिले.


कॉपी करू नका.