मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर फैजपूरात नगरसेवकांचे उपोषण मागे


फैजपूर : शिवसेना नगरसेवक अमोल निंबाळे व माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी सोमवार, 23 डिसेंबरपासून पालिका कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण मंगळवारी सायंकाळी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या लेखी पत्रामुळे मागे घेण्यात आले. शिवसेना नगरसेवक अमोल निंबाळे व माजी नगरसेवक तथा नगरसेविका पती मनोज कापडे यांनी 23 पासून पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले होते. फैजपूर पालिकेकडून पालिका हद्दीतील भुसावळ रोड, शिव कॉलनी व शिवाजी नगरात खुल्या जागा जागा स्वच्छ करून तारेचे कंपाऊंड व वृक्ष लावून हरीत पट्टा विकसित करीत असतांना संबंधित ठेकेदाराने जागा स्वच्छ न करता निकृष्ट दर्जाचे काम केले तसेच झालेल्या कामाचं रनिंग मीटर तारेचे कंपाउंड व केलेले काम हे जास्त वृक्षारोपण दाखवून बिल लाटल्याने संबंधित हरीत पट्टा वृक्षारोपणात निधीचा दुरूपयोग केला असल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अमोल निबाळे, माजी नगरसेवक तथा नगरसेविका पती मनोज कापडे यांनी पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले होे. त्याची दखल घेत मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी मंगळवार, 24 रोजी सायंकाळी उपोषणार्थींना लेखी पत्र दिले. हरीतपट्टा करण्याच्या कामाबाबत पंचनामा करण्यासह पालिकेकडे कायमस्वरूपी अभियंता नसल्याने पंचनाम्यासास वेळ लागणार असून प्रभारी कनिष्ठ अभियंता गुरुवारी कार्यालयात उपलब्ध झाल्यावर प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे तसेच पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल देण्यात येईल तो पर्यंत संबंधित जागेचे गेट सील करण्यात येत असल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, भुसावळ रोड, शिवकॉलनी व शिवाजी नगर येथील हरीत पट्टा कामाचे गेट सील करण्यात आले.


कॉपी करू नका.