फसवणुकीच्या गुन्ह्यातील पसार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अमळनेर : फसवणुकीच्या गुन्ह्यात अमळनेर पोलिसांना 2018 पासून वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मुसक्या आवळल्या आहेत. मुकेश सुभाष खुळे (41, रा.सोन्या मारुती हौसिंग सोसायटी, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास धुळे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार अनिल इंगळे, नाईक संतोष माईकल, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे व चालक मुरलीधर बारी आदींच्या पथकाने केली. आरोपीला वैद्यकीय चाचणी करून अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


