धुळे तालुका पोलिसांनी पकडला 17 लाखांचा गुटखा

चाळीसगावमार्गे अहमदाबादला नेला जात होता गुटखा : गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे : धुळे तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीवरून तब्बल 17 लाखांचा गुटखा पकडला. या प्रकरणी कंटेनर चालक अब्दुल्लाह अबु कलाम (वय 31, रा. रानीपूर, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरूड चौफुलीजवळ कंटेनर जप्त
हैद्राबाद येथून अहमदाबादकडे कंटेनरमधून गुटखा नेला जात असल्याची माहिती धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाल्यानंतर शिरूड चौफुलीजवळ नाकाबंदी करण्यात आली व 25 डिसेंबर रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास कंटेनर (क्रमांक के.ए. 01 एएफ 2392) ची झडती घेतल्यानंतर 61 पोत्यांमधून 16 लाख 47 हजार रुपये किंमतीचा 13 हजार 420 गुटखा तसेच सहा पोत्यांमधून 48 हजार रुपये किंमतीचा पान मसाला व 12 लाख रुपये किंमतीचा कंटनेर असा एकूण 28 लाख 95 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, साक्रीचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस नाईक हेमंत बोरसे, कॉन्स्टेबल अमोल कापसे, सुरेश पावरा, राकेश शिरसाठ, सुमीत चव्हाण यांच्या पथकाने केली.


