जळगावातील कुरीयर व्यावसायीकाकडे दरोडा : चौघांविरोधात गुन्हा
Robbery Of Courier Business In Jalgaon : Crime Against Four जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा रोड भागातील गुड्डू राजा नगरातील रहिवासी तथा कुरीयर व्यावसायीक प्रमोद विठ्ठल घाडगे (59) यांच्याकडे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चारही दरोडेखोरांनी चाकूसह कुर्हाडीचा धाक दाखवून 50 हजारांची रोकड, 35 हजार रुपये किंमतीची चैन व 75 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी लांबवल्या होत्या. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाडगे यांनी दिलेल्या वर्णनावरून दरोडेखोरांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा
घाडगे हे पत्नी व मुलासह पिंप्राळा रोड भागातील गुड्डू राजा नगरातील आई बिल्डींगमधील प्लॉट क्रमांक तीनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा कुरीअरचा व्यवसाय आहे. मुलगा सुद्धा प्रमोद घाडगे यांच्यासोबत कुरीअरचा व्यवसाय करतो. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चार दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले. चाकू, कुर्हाड तसेच लाकडं त्यांच्या हातात होती. त्यापैकी खालच्या गॅलरीत झोपलेल्या प्रमोद घाडगे व त्यांच्या पत्नी या दोघांना दररोखोराने पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. तसेच घरात कोण कोण आहे हे सुद्धा विचारले. घाडगे यांनी मुलगा वरच्या खोलीत झोपला आहे असे सांगितल्यावर तीन दरोडेखोर वरच्या खोलीत गेले व मुलाची कॉलर पकडून त्याला सुद्धा खाली घेऊन आले.






यानंतर तिघांना खाली बसून दरोडेखोर पुन्हा वरती गेले कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी 50 हजारांची रोकड घेतली तसेच 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व 35 व 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.एच.422 व एम.एच.19 डी.एन.1249) असा एकूण एक लाख 60 हजारांचा ऐवज घेवून पळ काढला होता. या प्रकरणी प्रमोद विठ्ठल घाडगे (59) यांनी जळगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चौघा दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.


