यावलमध्ये प्रभारी निरीक्षकांनी साधला नागरीकांशी संवाद

यावल : यावल पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक रवीकांत सोनवणे हे सुटीवर गेल्याने त्यांचा पदभार मुंबई क्राईम ब्रांचमध्ये सेवा दिलेल्या पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शनिवारी त्यांनी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी भेटी देवुन नागरीकांशी सुसंवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या.
वाहतूक नियम काटेकोरपणे पाळण्याची तंबी
यावल पोलीस स्टेशनला कालच रुजु झालेले पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी शनिवारी सकाळी यावल शहरातील फैजपूर रोडवरील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनवणे, उपप्राचार्य आणि कॉलेजच्या सर्व शिक्षकांशी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संवाद साधुन त्यांच्या समस्या व अडचणी समजुन घेतल्या तसेच यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट वरील मिनीडोअर व रीक्षा चालकांशी संपर्क साधला. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी तंबीही देण्यात आली तसेच अपघातासमयी आपल्या सहप्रवाशांना किंवा इतर वाहनधारकांना अपघाताप्रसंगी तातडीने मदत करावी, अशा प्रकारच्या सुचना दिल्या नंतर धनवडे यांनी बसस्थानक परीसराची पाहणी केली. गावातील बोरावल गेट पासुन तर बुरूज चौक पर्यतच्या शहरातील प्रमुख मार्गावरच्या बाजारपेठेतील बेशिस्तपणे दुकानासमोर उभ्या राहणार्या वाहनामुळे होणार्या पादचार्यांना त्रासाची दखल त्यांनी घेतली. यावर आपण तत्काळ सर्व व्यापारी बांधव व शांतता समितीच्या सदस्यांची आपण बैठक घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनवडे म्हणाले.


